न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ता कर ऑनलाइन भरणाऱ्या नागरिकांना मिळणाऱ्या १० टक्के सवलतीसाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत असल्याचे जाहीर केले आहे. या मुदतीनंतर सवलतीचा लाभ मिळणार नसून १ जुलैपासून थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
महापालिका हद्दीतील ७.४४ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांपैकी आतापर्यंत ४.१५ लाखांहून अधिक नागरिकांनी ४८३ कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कर भरला आहे. यामध्ये सुमारे ३.४६ लाख मालमत्ताधारकांनी ऑनलाइन कर भरून १० टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे.
उपायुक्त सचिन पवार यांनी उर्वरित नागरिकांनी अंतिम मुदतीपूर्वी कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच १ जुलैपासून वारंवार नोटीस देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध जप्तीसह नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही वेळेत कर भरून शहराच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.















