- दगडी पाटा व कोयत्याने वार करून केली हत्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे गुरव (दि. २९ जून २०२६) :- पिंपळे गुरव येथील लक्ष्मीनगर परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून एका व्यक्तीचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २८ जून २०२६ रोजी पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनगर लेन क्रमांक ४ येथील पहिल्या मजल्यावर वैष्णवी दुकानाजवळ घडला. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजय सर्जेराव शेलार यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सेल्वराज राजंगम (वय ५२) याला अटक केली असून, मयताचे नाव कन्नन बालकृष्ण पडाची असे आहे. प्राथमिक तपासानुसार, प्रॉपर्टीच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात झाले. आरोपीने कन्नन यांच्या डोक्यावर दगडी पाटा मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर लोखंडी कोयत्याने त्यांच्या मानेवर वार करून त्यांचा खून केल्याचा आरोप आहे.
घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
















