- ऊर्जामंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे संतोष सौंदणकर यांची मध्यस्थीची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २० एप्रिल २०२६) :- केंद्र सरकारच्या आरडीएसएस (RDSS) योजनेअंतर्गत शहरातील वीज वाहिन्या भूमिगत करून विद्युत पुरवठा अधिक सक्षम व सुरळीत करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुण्यात रखडण्याची चिन्हे दिसत आहेत. खोदकाम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून आवश्यक परवानगी दिली जात नाही. त्यामुळे आपण यात लक्ष घालून पुणे मनपा प्रशासनाची बैठक घेऊन परवानगी देणेबाबत त्यांना आदेशित करावे, अशी मागणी शिवसेना जिल्हा संघटक तथा पुणे सनियंत्रण समितीचे सदस्य संतोष सौंदणकर यांनी राज्याचे उर्चा मंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे केली आहे.
सौंदणकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे महापालिका हद्दीत विद्युत वाहिन्या भूमीगत करण्याचे काम सध्या रखडले आहे. त्यासाठी आवश्यक परवानग्या उपलब्ध करण्यासाठी महावितरणकडून महापालिकेशी सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला. तरी परवानगी देणेबाबत महापालिका स्तरावर तोडगा निघालेला नाही. हे काम पूर्ण न झाल्यास ऐन पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत अशाच प्रकारची कामे सुरळीत सुरू असून तेथे आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. मात्र, पुणे महापालिका क्षेत्रात परवानगीअभावी कामात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच, महापालिकेकडून खोदकामासाठी केवळ मार्च-एप्रिल या कालावधीतच परवानगी दिली जाते, तर १ मेनंतर खोदकामास बंदी असते. पावसाळ्यात ही कामे करणे शक्य नसल्याने सध्याचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
या पार्श्वभूमीवर ऊर्जा मंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून महापालिका प्रशासनासोबत बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढावा, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी संतोष सौंदणकर यांनी उर्जा मंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे केली आहे.











