- आंदोलना दरम्यान स्वतःच्याच सरकारचं केलं ‘खाली डोकं वर पायं’..
- घोषणातील गोंधळामुळे नगरसेवकांमध्ये उडाली खळबळ…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ आयोजित आंदोलनादरम्यान भाजप आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांकडून अनपेक्षितरित्या स्वतःच्याच सरकारविरोधात घोषणाबाजी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महापालिका प्रवेशद्वारासमोर भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या वतीने विरोधकांच्या भूमिकेविरोधात निदर्शने करण्यात आली होती. या वेळी विधान परिषद आमदार उमा खापरे, महापौर रवी लांडगे, पक्षनेते प्रशांत शितोळे तसेच अनेक पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
निदर्शनादरम्यान घोषणाबाजीची सुरुवात करताना भाजपचे पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी “या सरकारचे करायचं काय?” अशी घोषणा दिली. त्यावर उपस्थित नगरसेवकांनी “खाली डोकं वर पाय” अशी जोरदार प्रतिक्रिया दिली. काही क्षणांनंतर घोषणेतील संदर्भ लक्षात येताच शितोळे यांनी “एनडीए सरकारचं करायचं काय?” अशी सुधारित घोषणा दिली; मात्र नगरसेवकांनी पुन्हा त्याच स्वरात प्रतिसाद दिल्याने गोंधळ अधिकच वाढला.
घोषणांमधील विसंगती लक्षात येताच काही काळासाठी वातावरणात संभ्रम निर्माण झाला. अखेर परिस्थिती सावरत आमदार उमा खापरे यांनी हस्तक्षेप करत “एनडीए आघाडीचा विजय असो” अशी घोषणा देत कार्यकर्त्यांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, राजकीय पातळीवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.











