- स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या प्रयत्नांना यश…
- स्थायीच्या मंजुरीनंतर डीपीआर तयार करण्याचा प्रश्न सुटणार…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून नाशिक महामार्ग ते वाकड या मार्गावर इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम (इआरटीएस) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या मंजुरीनंतर सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात शहरातील नागरिकांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा आधुनिक पर्याय उपलब्ध होणार आहे.
राज्य शासन स्तरावर ११ एप्रिल २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी मेट्रो, मेट्रो निओ, बीआरटीएस आणि इआरटीएस या पर्यायांचा सविस्तर आढावा घेण्यात आला होता. बीआरटीएसला नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने भविष्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी इआरटीएस हा अधिक सक्षम आणि आधुनिक पर्याय असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले होते.
या निर्णयानंतर महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) मार्फत इआरटीएस प्रणाली किती योग्य याची तपासणी करण्यात आली. त्यासाठी सल्लागार नेमण्यासह सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. यासंदर्भात महापालिका प्रशासन, महामेट्रो आणि राज्य शासन यांच्यात अनेक स्तरांवर चर्चा झाली. दरम्यान, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी हा विषय सातत्याने लावून धरत शहराच्या भविष्यातील वाहतूक नियोजनासाठी इआरटीएस प्रकल्पाला प्राधान्य देण्याची भूमिका घेतली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर हा विषय स्थायी समिती सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला.
या मार्गावर “इआरटीएस” सेवा…
मंजूर प्रस्तावानुसार नाशिक महामार्गावरील गोडाऊन चौक-कुदळवाडी चौक- ऑटो क्लस्टर- काळेवाडी फाटा ते जगताप डेअरी चौक- वाकड चौक या मार्गावर “इआरटीएस”चा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा मार्ग नाशिक महामार्गाला बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा असल्याने भविष्यात शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास आणि नागरिकांना जलद सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे. महामेट्रोने सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया राबविली असून या विषयाला स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी मंजुरी दिल्यानंतर शहर सुधारणा आणि महासभेच्या मंजुरी घेतली जाणार आहे.
सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे काळाची गरज – अभिषेक बारणे…
याबाबत बोलताना स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहराची वाढ लक्षात घेता भविष्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे ही काळाची गरज आहे. इआरटीएस हा अत्याधुनिक, पर्यावरणपूरक आणि जलद प्रवासाचा पर्याय ठरणार आहे. शहराच्या विकासासाठी हा महत्त्वाचा टप्पा असून प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

















