- SIR निवडणूक कामातून मुक्त करण्याची मागणी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० जुलै २०२६) :- विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेसाठी आशा स्वयंसेविकांची सहाय्यक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO Assistant) म्हणून करण्यात आलेली नियुक्ती तात्काळ रद्द करावी, अन्यथा 24 जुलै रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेवर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाने दिला आहे.
महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, आशा स्वयंसेविका या नियमित शासकीय कर्मचारी नसून मानधनावर कार्य करणाऱ्या आरोग्य सेविका आहेत. त्यांच्यावर गर्भवती माता, नवजात बालके, लसीकरण, कुपोषण निर्मूलन, संसर्गजन्य आजारांचे सर्वेक्षण आणि विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीचे अतिरिक्त काम दिल्यास आरोग्य सेवांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
संघटनेने निवेदनासोबत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (NHM) आयुक्तांनी यापूर्वी जारी केलेली पत्रेही जोडली आहेत. या पत्रांमध्ये आशा स्वयंसेविकांना BLO आणि SIR संबंधित कामांमधून सूट देण्याची शिफारस करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून प्रामुख्याने शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांतील अधिकृत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची तरतूद असल्याचेही संघटनेने नमूद केले आहे.
दरम्यान, काही महापालिका आणि स्थानिक प्रशासनाने SIR मोहिमेसाठी BLO सहाय्यक म्हणून आशा स्वयंसेविका किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत स्वतंत्र परिपत्रके काढल्याचेही संबंधित कागदपत्रांत दिसून येते. त्यामुळे या विषयावर विविध स्तरांवर वेगवेगळ्या भूमिका असल्याचे स्पष्ट होत आहे.
आशा स्वयंसेविकांची BLO सहाय्यक म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द न झाल्यास 24 जुलै २ रोजी दुपारी १ वाजता पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे उपाध्यक्ष निलेश दाताखिळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

















