- दुर्घटनाग्रस्तांना न्याय, दोषींवर कारवाई व मोशीतील प्रलंबित प्रश्न सोडविण्याची ग्रामस्थांची मागणी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० जुलै २०२६) :- मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प परिसरात झालेल्या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांच्या मागण्यांबाबत सोमवारी महापौर रवि लांडगे यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीत मोशी ग्रामस्थांनी दुर्घटनाग्रस्तांना न्याय, दोषींवर कारवाई, परिसरातील सुरक्षितता तसेच स्थानिक प्रलंबित प्रश्नांबाबत विविध मागण्या मांडल्या.
ग्रामस्थांनी दुर्घटनेस जबाबदार अधिकारी, संबंधित यंत्रणा आणि कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी, मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, जखमींच्या उपचाराचा खर्च शासनाने उचलावा, पीडित कुटुंबातील एका पात्र सदस्याला नोकरी द्यावी, मोशी कचरा डेपोबाबत निर्णय घ्यावा तसेच आरोग्य, पर्यावरण आणि नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, अशी मागणी केली.
बैठकीत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ग्रामस्थांनी मांडलेल्या मागण्यांची दखल घेत संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात येतील तसेच प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.
महापौर रवि लांडगे यांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना न्याय मिळावा आणि नागरिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे सांगितले.
या बैठकीला स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, प्रभाग अध्यक्षा अर्चना सस्ते, नगरसदस्या सारिका गायकवाड, सारिका बोऱ्हाडे, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, माजी नगरसदस्य धनंजय आल्हाट, मंदा आल्हाट, सामाजिक कार्यकर्ते राजेश सस्ते, उदय गायकवाड, निलेश बोऱ्हाडे, नितीन बोऱ्हाडे तसेच मोशी ग्रामस्थ उपस्थित होते.

















