- डाॅ. बाबा कांबळे यांचा जनआंदोलनाचा इशारा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० जुलै २०२६) :- टू-व्हीलर टॅक्सी सेवा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक असून खासगी कंपन्यांच्या हितासाठी रिक्षा-टॅक्सी व्यवसाय संपविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी केला. अशा धोरणाला संघटना कडाडून विरोध करणार असून, लवकरच जाहीर सभा घेऊन पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी विजय ढगारे यांच्या नियुक्तीनिमित्त आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी तब्बल २० वर्षांनंतर शहराध्यक्षपदात बदल झाल्याचा उल्लेख करत विजय ढगारे यांच्या नेतृत्वामुळे रिक्षा चालक-मालकांच्या प्रश्नांच्या लढ्याला नवे बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संघटनेत नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांचा समन्वय साधून नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली असून सर्वांनी एकत्रितपणे रिक्षा व टॅक्सी चालकांच्या प्रश्नांसाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. कांबळे यांनी सांगितले की, यापूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा चालकांनी कायदेशीर लढा देऊन बेकायदेशीर टू-व्हीलर टॅक्सी सेवा बंद करण्यास भाग पाडले होते. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही रिक्षा चालकांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिले आहेत. त्यामुळे पुन्हा अशा सेवेला परवानगी देण्याचा प्रयत्न झाल्यास न्यायालयीन लढ्यासोबतच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल.
बैठकीत टू-व्हीलर टॅक्सी परवान्यांविरोधात उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी ‘शिस्त आणि सेवा’ अभियान राबविणे, सर्व रिक्षांमध्ये मीटरचा वापर अनिवार्य करणे, मेट्रो स्थानकांवर रिक्षांसाठी अधिकृत पार्किंग व नियोजित थांबे उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे आणि प्रवाशांशी गैरवर्तन करणाऱ्या चालकांवर संघटनात्मक स्तरावर कारवाई करण्याचेही ठरविण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या विविध विभागांसाठी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. महिला आघाडी, विद्यार्थी सेना, निगडी विभाग आणि रिक्षा ब्रिगेडसह विविध आघाड्यांवर नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.
या बैठकीला महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष शुभम तांदळे, रिक्षा ब्रिगेडचे राज्य प्रमुख अनिल शिरसाट, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विजय ढगारे, राज्य प्रवक्ते धनंजय कुदळे, कार्याध्यक्ष दीपक ताटे, युवक अध्यक्ष विशाल ससाणे, राज्य उपप्रमुख सुनील कदम, विद्यार्थी वाहतूक विभागाचे अध्यक्ष प्रदीप आयर, शहर संघटक दत्ता गिल्ले, खेड तालुका अध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी, रिक्षा चालक व कार्यकर्ते उपस्थित होते.

















