- प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या सेवेमुळे रथयात्रा सुरळीत पार…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० जुलै २०२६) :- अंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) रावेतच्या वतीने रविवारी (दि. १९ जुलै) आयोजित करण्यात आलेली ‘पिंपरी-चिंचवड जगन्नाथ रथयात्रा २०२६’ भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाली. रथयात्रेत शहरातील हजारो कृष्णभक्त सहभागी झाले होते.
प्रभू जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या सुशोभित मूर्तींची रथात प्रतिष्ठापना करून सायंकाळी ४ ते ७ या वेळेत सेलेस्टियल सिटी – एस. बी. पाटील स्कूल मार्ग ते इस्कॉन रावेत मंदिर या मार्गावरून रथयात्रा काढण्यात आली. हजारो भाविकांनी भक्तिभावाने रथ ओढत सहभाग नोंदविला.
रथयात्रेदरम्यान प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच पर्यायी मार्गांवर वाहतूक सुरळीत राहावी यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या ७५ एसपीओ व स्वयंसेवकांनी वाहतूक नियोजनाची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे रथयात्रा कोणताही अडथळा न येता नियोजित वेळेत पूर्ण झाली.
यावेळी समितीचे विभाग प्रमुख विशाल शेवाळे, राजेंद्र कुंवर, सतीश देशमुख, सातप्पा पाटील, सुभाष माने, रवींद्र जांभळे, रवींद्र पवार, नितीन ढमणगे, प्रशांत जमदाडे, उद्धव कुंभार, तेजस सापरिया, महिला विभाग प्रमुख जागृती वायकुळे, शिल्पा हेरलगी, उर्मिला देशमुख, अनुराधा वाघचौरे, ललिता भारंबे आदी पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.
रथयात्रेचे एकूण व्यवस्थापन इस्कॉन रावेतचे अध्यक्ष प्रभुजी गौरांग दास, प्रभुजी जयप्रकाश भामरे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी केले.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील म्हणाले, “दरवर्षी मोठ्या संख्येने कृष्णभक्त भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत सहभागी होत असतात. रावेतसारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरात वाहतुकीचे योग्य नियोजन करणे आवश्यक असते. यंदा समितीच्या ७५ एसपीओ व महिला स्वयंसेवकांनी सेवाभावाने ही जबाबदारी पार पाडली.”
तर इस्कॉन रावेतचे अध्यक्ष प्रभुजी गौरांग दास म्हणाले, “दरवर्षी रथयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेलाही तितकेच महत्त्व आहे. सुरक्षा समितीचे एसपीओ, स्वयंसेवक आणि विशेषतः महिला स्वयंसेविकांनी पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने प्रमुख चौकांमध्ये वाहतूक नियोजनाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली. त्यामुळे यंदाची रथयात्रा सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.”

















