न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूरोड (दि. ६ जून २०२६) :- देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरीदरम्यान मंजूर झालेल्या दोन भुयारी मार्गांच्या (अंडरपास) कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या कामासाठी सदर्न कमांड ब्रिगेडियर आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने तत्त्वतः मान्यता दिली असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
देहूरोड येथील सदर्न कमांडमध्ये झालेल्या आढावा बैठकीत एमएसआरडीसी, कॅन्टोन्मेंट बोर्ड, ऑर्डनन्स फॅक्टरी आणि संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एमएसआरडीसीकडून अंडरपासला मंजुरी मिळाल्याचे बारणे यांनी सांगितले.
याशिवाय, काळोखे मळा ते हगवणे वस्ती रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील संरक्षण विभागाच्या हद्दीतील रस्त्यांच्या दुरुस्तीलाही मान्यता देण्यात आली. किवळे येथील महावितरण लाईनसंदर्भातील प्रश्नावरही बैठकीत चर्चा झाली.














