- कार्यकारी अभियंता अभिमान भोसले यांची पीएमआरडीएत बदली; महापालिकेतून कार्यमुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १८ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र विधानमंडळाचे २०२६ चे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून मुंबई येथे सुरू होत असून, अधिवेशनादरम्यान महापालिकेसंदर्भातील तारांकित, अतारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, स्थगन प्रस्ताव आदी विषयांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासकीय कामकाजासाठी उपायुक्त राजेश आगळे यांची समन्वय अधिकारी तर सहायक आयुक्त अजिंक्य येळे यांची सहायक समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अभियांत्रिकी विषयांसाठी सहशहर अभियंता सुनील भागवानी यांच्याकडे समन्वय अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली असून कार्यकारी अभियंता सुर्यकांत मोहिते यांची सहायक समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, महापालिकेच्या स्थापत्य विभागातील कार्यकारी अभियंता अभिमान भोसले यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) येथे कार्यकारी अभियंता पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पदोन्नतीच्या रिक्त पदावर दोन वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना बुधवारी (दि. १७) महापालिकेतून कार्यमुक्त करण्यात आले. यासंदर्भातील आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत. प्रशासकीय नियुक्त्या आणि बदलीमुळे महापालिकेतील कामकाजाला नव्या घडामोडींची जोड मिळाली आहे.















