- कॉलनीत पाणी न सोडल्याच्या कारणावरून वाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २६ जून २०२६) :- ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानेश्वर मेदनकर (वय ४५, रा. मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) हे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याचे काम करत आहेत. २४ जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास शिर्के यांच्या विटभट्टीजवळील रस्त्यावर ते ग्रामपंचायतीचे पाणी सोडण्याचे काम करत असताना हा प्रकार घडला.
या प्रकरणात रेखा सुनील बोरकर आणि शहाजी पवार (दोघेही रा. बापदेव वस्ती, मेदनकरवाडी, ता. खेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉलनीत पाणी सोडले नसल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला दुचाकीवरून खाली ओढले, शिवीगाळ केली आणि मारहाण केली, असा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करून त्यांना काम करण्यापासून परावृत्त केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास चाकण दक्षिण पोलीस करत असून पोलीस हवालदार बांगर हे तपास अधिकारी आहेत.
















