- ५ वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २६ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत रविवार, दि. २८ जून रोजी शहरभर राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार असून, पालकांनी आपल्या बालकांना जवळच्या लसीकरण केंद्रावर नेऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
शहरात सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ११२३ लसीकरण केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच दि. २९ जून ते ३ जुलैदरम्यान आरोग्य कर्मचारी घरभेटी देऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना पोलिओचा डोस देणार आहेत.
या मोहिमेसाठी ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी, ९५ वैद्यकीय अधिकारी, ३१९ पर्यवेक्षक आणि ४५५२ लसीकरण कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, एएनएम, एमपीडब्ल्यू, महाविद्यालयीन विद्यार्थी, रोटरी क्लबचे स्वयंसेवक आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही मोहिमेत सहभागी होणार आहेत.
महापालिकेची रुग्णालये, दवाखाने, खासगी रुग्णालये, अंगणवाडी, बस, रेल्वे व मेट्रो स्थानके तसेच स्थलांतरित वस्त्यांमध्ये लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यापूर्वी पोलिओचे डोस घेतले असले तरी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेतील डोस प्रत्येक बालकासाठी आवश्यक असल्याचे वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले आहे.















