- संस्कृत श्लोक पठणात रचला इतिहास; पूज्य कोठारी स्वामींच्या हस्ते सन्मान…
- भाजप शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न (बापू) काटे यांच्याकडून विशेष कौतुक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ ऑगस्ट २०२६) :- भारताच्या प्राचीन संस्कृतीचा आणि आर्ष अध्यात्माचा वारसा बालवयातच जोपासत पिंपळे सौदागर येथील चिमुकल्या कु.कियांश शर्मा (सुपुत्र: श्री.प्रज्ञेश व सौ.रेना शर्मा) याने थेट ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ (Guinness World Records) च्या जागतिक मंचावर भारताचा तिरंगा फडकावला आहे.
संस्कृत श्लोकांच्या अमोघ पठणाने जागतिक विक्रमाची नोंद करणाऱ्या कियांशला अधिकृत गिनीज प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले असून, त्याच्या या अलौकिक यशामुळे संपूर्ण पिंपरी- चिंचवड शहराची मान अभिमानाने उंचावली आहे.
भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री.शत्रुघ्न (बापू) काटे यांनी कु.कियांश शर्मा याचे विशेष कौतुक करत त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल शर्मा कुटुंबाचे अभिनंदन केले व बालकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उदंड शुभेच्छा दिल्या.
वडोदरा येथील सोहळ्यात संस्कृत श्लोकांचा गजर…
२ फेब्रुवारी २०२६ रोजी वडोदरा येथे आयोजित ऐतिहासिक ‘सत्संग दीक्षा फिनाले ‘ दरम्यान भव्य ‘संस्कृत श्लोक पठण’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात कियांशने अत्यंत प्रगल्भ पाठांतर, शुद्ध उच्चारण आणि अढळ शिस्तीच्या जोरावर श्लोक पठण करत या जागतिक विक्रमात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले. त्याच्या या अद्भुत यशाची दखल घेत ८ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित विशेष भव्य सत्कार समारंभात पूज्य कोठारी स्वामी (पू. कोठारी बापा) यांच्या शुभहस्ते कियांशला ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’चे अधिकृत प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
भारतीय संस्कृतीचे जतन करणारा बालतारा – श्री शत्रुघ्न (बापू) काटे…
कियांशच्या यशावर आनंद व्यक्त करताना भाजप शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले,
“आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात एवढ्या लहान वयात पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहून, आपल्या संस्कृत भाषेचा आणि आध्यात्मिक मूल्यांचा वारसा जपणे ही अत्यंत दुर्मिळ व कौतुकास्पद बाब आहे. कियांशने मिळवलेले हे ‘गिनीज रेकॉर्ड’ केवळ त्याच्या कुटुंबाचाच नाही, तर संपूर्ण पिंपळे सौदागर आणि पिंपरी-चिंचवड शहराचा गौरव आहे. त्याची ही निष्ठा आणि साधना आजच्या पिढीतील इतर बालकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.”
कु.कियांश शर्माच्या या अलौकिक यशामुळे पिंपळे सौदागर परिसरात उत्साहाचे वातावरण असून, सर्वच स्तरातून या चिमुकल्या बालकावर आणि शर्मा कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


















