- भाजप पक्षनेते प्रशांत शितोळे यांची पत्रकार परिषदेत टीका..
- आमदार महेश लांडगे यांना जाणिवपूर्वक टार्गेट करत असल्याचा आरोप..
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १४ ऑगस्ट २०२६) :- राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे नेमके विकासकामांचा आढावा घेण्यासाठी येतात की भाजपची बदनामी करण्यासाठी ?, पवार हे मोशी कचरा डेपो दुर्घटनेवरून हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांना जाणीवपूर्वक टार्गेट करत आहेत, अशी टीका पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी पत्रकार परिषदेत केली.
मोशी कचरा डेप्पो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत भेट देऊन प्रशासनाकडून माहिती घेतली होती. अधिकाऱ्यांकडून विकास कामांचा आढावा घेतला होता, आणि काही महत्त्वाच्या सूचना देखील केल्या होत्या. त्यावर अधिकाऱ्यांनी महिनाभरात आपण केलेल्या सूचनांची पूर्तता केली जाईल असे आश्वासन दिले होते. त्याचा आढावा घेण्यासाठी आमदार रोहित पवार आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आले होते. त्यावेळी त्यांनी विकास कामावरून आणि मोशी दुर्घटनेतील निष्पाप लोकांच्या बळी गेल्याच्या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना पुन्हा टार्गेट केले. मोशी कचरा डेपो येथील दुर्घटनेला आमदार महेश लांडगे जबाबदार असल्याचा घणाघात त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला.
त्यांच्या आरोपाला प्रतिउत्तर देण्यासाठी सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. रोहित पवार हे आमदार महेश लांडगे यांना जाणून बुजून टार्गेट करत आहेत. ते मोशी दुर्घटनेतील पीडितांचे सांत्वन करण्यासाठी येतात की भाजपचे हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांची बदनामी करण्यासाठी येतात ? महेश लांडगे यांनी मोशी येथील कचरा उभा केला का ? अशा प्रकरणात राष्ट्रवादीने यापूर्वी कधीही बदनामीचे राजकारण केले नाही. आमची प्राथमिकता शहरातील समस्या सोडविण्याला आहे, सहा महिन्यात पिंपरी-चिंचवडचे सिंगापूर होऊ शकत नाही. त्याला अवधी लागणार आहे, असे स्पष्टीकरण शितोळे यांनी केले.

















