- पती गमावलेल्या महिलेच्या दुःखावर मानसिक छळाचे घाव बसत गेले..
- मग तिने जीवनच संपवले…
सूरज करांडे (क्राइम)…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १४ ऑगस्ट २०२६) :- मोशी कचरा डेपो दुर्घटनेने एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतला… पतीच्या मृत्यूनंतर शासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या पैशांच्या वाटपावरून सुरू झालेल्या वादाने मात्र या कुटुंबातील दुःख आणखी गहिरे केले. पतीच्या मृत्यूचे दुःख मनात असतानाच मानसिक छळ आणि टोमण्यांना सामोरे जावे लागल्याने एका महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक आरोप पोलिस तक्रारीत करण्यात आला आहे.
मोशी येथील संजय गांधीनगर परिसरात २०२१ ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीतील कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे. १३ ऑगस्ट रोजी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस तक्रारीनुसार, संबंधित महिलेच्या पतीचा मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मदतनिधी मिळणार होता. मात्र, त्या मदतनिधीच्या पैशांच्या वाटपावरून तिच्यावर वाद, शिवीगाळ आणि मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच हुंडा न दिल्याने, खर्च न केल्याने आणि मुलीच झाल्याच्या कारणावरूनही तिला वारंवार टोमणे मारण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
ज्याच्या मृत्यूने घराचा आधारच हिरावला, त्याच मृत्यूच्या मदतीच्या पैशांवरून पुन्हा घरातच संघर्ष सुरू झाला… पती गमावलेल्या महिलेच्या दुःखावर मानसिक छळाचे घाव बसत गेले आणि अखेर तिने जीवन संपवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मोशी कचरा डेपो दुर्घटनेत पती गमावलेल्या या महिलेच्या कुटुंबावर आलेल्या या दुहेरी आघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी भोसरी पोलिस करीत आहेत.

















