- व्हाईस चेअरमनपदी चंद्रकांत भोईर; सेक्रेटरी भास्कर फडतरे, खजिनदार विश्वनाथ लांडगे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवकांची पतसंस्था मर्या.च्या सन २०२३-२०२८ या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत विजय सभाजी मुंडे यांची चेअरमनपदी, चंद्रकांत संपतराव भोईर यांची व्हाईस चेअरमनपदी, भास्कर मारुती फडतरे यांची सेक्रेटरीपदी तर विश्वनाथ जगन्नाथ लांडगे यांची खजिनदारपदी एकमताने निवड करण्यात आली.
दि. १२ ऑगस्ट रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक सहकारी जिल्हा उपनिबंधक गजेंद्र एल. सवाईकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. यावेळी पिंपरी-चिंचवड मनपा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे उपस्थित होते.
सभासदांना बचतीस प्रोत्साहन देण्यासाठी ठेवींवर ९ टक्के, कन्यादान ठेवींवर १० ते १०.५० टक्के व्याजदर देण्याचे धोरण ठरविण्यात आले. तसेच ११ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला.
संस्थेची वार्षिक उलाढाल २०४ कोटी रुपयांवर पोहोचली असून कर्जमर्यादा २० लाख रुपये करण्यात आली आहे. थकबाकीचे प्रमाण ०.६० टक्के असून संस्थेला सातत्याने ‘अ’ वर्ग दर्जा मिळाला आहे. संस्थेने सलग ५४ वर्षे नफा मिळवून सभासदांना लाभांश दिला आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सभासदहिताला प्राधान्य देत संस्थेचा पारदर्शक व तत्पर कारभार करण्याचा निर्धार व्यक्त केला.


















