- रानवडे घराण्यातील तीन मानकऱ्यांची निवड…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी | दि. ३० जून २०२६ :- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळा २०२६ साठी माउलींच्या रथाला बैलजोडी जुंपण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद अखेर सामोपचाराने निकाली निघाला आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने बैलजोडी निवड समितीच्या शिफारशीनुसार रानवडे घराण्यातील तीन मानकऱ्यांच्या बैलजोडींची अधिकृत निवड जाहीर केली आहे.
नियोजनानुसार पुणे जिल्ह्यातील मार्गक्रमणासाठी हर्षवर्धन प्रदीप रानवडे यांच्या बैलजोडीची निवड करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील प्रवासादरम्यान उमेश लक्ष्मण रानवडे यांच्या बैलजोडीला रथ ओढण्याचा मान मिळणार असून, सोलापूर जिल्ह्यातील मार्गक्रमणासाठी तुळशीराम ज्ञानोबा रानवडे यांच्या बैलजोडीची निवड करण्यात आली आहे. जाणे व परतीचा प्रवास या दोन्ही टप्प्यांमध्ये संबंधित मानकऱ्यांच्या बैलजोडी रथाला जुंपल्या जाणार आहेत.
यापूर्वी बैलजोडी निवडीवरून मतभेद निर्माण झाले होते. उमेश रानवडे यांनी निवड प्रक्रियेवर आक्षेप घेत उपोषण केले होते तसेच न्यायालयात जाण्याची भूमिकाही जाहीर केली होती. त्यामुळे पालखी सोहळ्यापूर्वी हा प्रश्न चर्चेचा विषय ठरला होता.
रविवारी रात्री देवस्थान, बैलजोडी निवड समिती आणि रानवडे कुटुंबीय यांच्यात झालेल्या बैठकीत सर्वानुमते तोडगा काढण्यात आला. त्यानंतर संस्थान कमिटीने अधिकृत पत्र देऊन निवड निश्चित केली. प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे आणि पालखी सोहळा प्रमुख अॅड. राजेंद्र उमाप यांच्या स्वाक्षरीने मानकऱ्यांना पत्रे सुपूर्द करण्यात आली.
बैठकीला विश्वस्त, बैलजोडी निवड समितीचे पदाधिकारी आणि रानवडे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निर्णयामुळे पालखी सोहळ्यापूर्वी निर्माण झालेला वाद संपुष्टात आला असून यंदाची आषाढी वारी निर्विघ्न वातावरणात पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
















