पिंपरी-चिंचवडमधून १० हजार भीमसैनिक सहभागी होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड | दि. ३० जून २०२६ :- आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आज (मंगळवार, दि. ३० जून) मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या विराट महामोर्चात पिंपरी-चिंचवड शहरातून सुमारे १० हजार भीमसैनिक सहभागी होणार असल्याची माहिती नियोजन बैठकीत देण्यात आली.
पिंपरी येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे कष्टकरी नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महामोर्चाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. शहरातील विविध भागांत जनजागृती मोहीम, कार्यकर्त्यांच्या बैठका आणि प्रवासाचे नियोजन पूर्ण करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मुंबईतील महामोर्चाचे नेतृत्व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार बाबूराव माने आणि अधिवक्ता सुरेश माने करणार आहेत.
यावेळी डॉ. बाबा कांबळे यांनी हा लढा शासनाच्या धोरणांविरोधात असून कोणत्याही समाजाविरोधात नसल्याचे स्पष्ट केले. सामाजिक सलोखा कायम ठेवत लोकशाही मार्गाने भूमिका मांडण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्येष्ठ नेते बाळासाहेब भागवत यांनीही हे आंदोलन कोणत्याही समाजाविरोधात नसल्याचे सांगत कार्यकर्त्यांना शांततेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.
बैठकीस देवेंद्र तायडे, गुलाब पानपाटील, सुरेश रोकडे, रमेश चिमूरकर, दत्तात्रय गायकवाड, महेंद्र सरवदे, कमलेश वाळके, विनोद गायकवाड, राहुल डंबाळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















