- मावळातल्या शेतकऱ्यांनी दिला नवा पर्याय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ | दि. ३० जून २०२६ :- पिंपरी-चिंचवड शहरासाठी प्रस्तावित पवना धरणाच्या बंदिस्त जलवाहिनी (पाइपलाइन) प्रकल्पाबाबत ३ जुलै रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीकडे मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.
या बैठकीपूर्वी शेतकरी, विविध संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रकल्पासंदर्भात आपापल्या भूमिका शासनापुढे मांडल्या आहेत.
मावळातील शेतकऱ्यांनी शहराच्या पाणीपुरवठ्याला विरोध नसल्याचे स्पष्ट करताना नदीपात्रातील नैसर्गिक प्रवाह अबाधित ठेवण्याची मागणी केली आहे. बंदिस्त जलवाहिनीमुळे नदीतील पाण्याचा प्रवाह कमी होऊन शेती, पर्यावरण, पशुपालन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
शेतकरी संघटनांच्या मते, पवना नदीच्या पाण्यावर सुमारे १० ते १५ हजार एकर बागायती क्षेत्र, भाजीपाला, फुलशेती, ऊस, फळबागा तसेच दुग्धव्यवसाय अवलंबून आहे. त्यामुळे नदीतील प्रवाह कायम ठेवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
यावर पर्याय म्हणून सध्या धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याची व्यवस्था कायम ठेवावी आणि पिंपरी-चिंचवडसाठी आवश्यक पाणी गहुंजे परिसरातून उचलून शहराकडे वळविण्याचा पर्याय स्वीकारावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. यामुळे शहराचा पाणीपुरवठाही सुरळीत राहील आणि नदीचा प्रवाहही कायम राहील, असा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रश्नावर मावळातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्याची भूमिका मांडली आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि आमदार सुनील शेळके यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून या विषयावर एकत्रित भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
३ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी प्रकल्पाच्या विविध पैलूंवर चर्चा करून पुढील निर्णय घेण्याची शक्यता आहे.
















