- १२, ९ आणि ६ मीटरचे रस्ते विकसित करण्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ नोव्हेंबर २०२६) :- रहाटणी-काळेवाडी परिसरातील रस्त्यांची तसेच सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षित असलेल्या जागा तातडीने महापालिकेच्या ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या परिसरातील काही नागरिकांनी रस्त्यांच्या आरक्षणाचा मोबदला घेऊनही जागा अडवून ठेवल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून नागरिकांना वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. तापकीर मळा ते पिंपरीगाव पूल, लक्की बेकरी ते पिंपरीगाव तसेच राजवाडेनगर ते पिंपरी पूल हे रस्ते विकसित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तसेच १२, ९ आणि ६ मीटर रुंदीच्या रस्त्यांसाठी जागा ताब्यात घेऊन बाधित जमीनधारकांना बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. आरक्षित जागा ताब्यात घेऊन रस्ते विकसित केल्यास काळेवाडी-रहाटणीचा नियोजनबद्ध विकास होऊन नागरिकांना चांगल्या रस्त्यांसह मूलभूत सुविधा मिळतील, असे तापकीर यांनी निवेदनात म्हटले आहे.

















