न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०१९) :- वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. भारताच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा तब्बल ८९ धावांनी पराभव झाला आहे. या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला विजयासाठी ३३७ रनचं आव्हान दिलं होतं. पण पाऊस पडल्याने डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे पाकिस्तानला विजयासाठी ४० ओव्हरमध्ये ३०२ रनचं आव्हान मिळालं. पण पाकिस्तानला २१२/६ एवढाच स्कोअर करता आला.
भारताकडून विजय शंकर, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. भारताने ठेवलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला सुरुवातीलाच पहिला धक्का बसला. विजय शंकरने इमाम उल हकला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यानंतर फकर जमान आणि बाबर आझम यांनी पाकिस्तानच्या इनिंगला आकार द्यायला सुरुवात केली. फकर जमानने ६२ रन तर बाबर आजमने ४८ रनची खेळी केली. या दोघांची विकेट गेल्यानंतर मात्र पाकिस्तानला भारताच्या बॉलरनी वारंवार झटके दिले.
या विजयाबरोबरच भारताचं पाकिस्तानविरुद्धचं वर्ल्ड कपमधलं विजयाचं रेकॉर्ड कायम राहिलं आहे. वर्ल्ड कपमधला भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा ७ मॅचमधला ७ वा विजय आहे. याआधी १९९२, १९९६, १९९९, २००३, २०११ आणि २०१५ साली भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती.











