न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ६ जुलै २०२६) :- निगडीतील भक्ती-शक्ती उड्डाणपूल ते आकुर्डी सिग्नलदरम्यान मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, पावसाचे पाणी साचल्यामुळे ते वाहनचालकांना दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
या मार्गावर निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्याने वाहतुकीवरही परिणाम होत आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना हजारो वारकरी या मार्गाने येणार असल्याने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच मेट्रो प्रकल्प प्रशासनाने पुढील २४ तासांत खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित करावा, अन्यथा निगडी सिग्नल येथे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना करण्याचीही त्यांनी मागणी केली.
















