- पाटण गावावर शोककळा.
- मुसळधार पावसामुळे घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पाटण, मावळ (दि. ६ जुलै २०२६) :- मावळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी पहाटे पाटण गावात भीषण दुर्घटना घडली. घरावर दरड कोसळल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत शेतकरी नंदकुमार दत्तू तिकोणे, त्यांच्या पत्नी अनिता नंदकुमार तिकोणे आणि मुलगा ज्ञानेश्वर (माऊली) नंदकुमार तिकोणे यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण पाटण गावासह मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डोंगराचा मोठा भाग खचून तो थेट तिकोणे कुटुंबाच्या घरावर कोसळला. काही क्षणांतच घर माती, दगड आणि झाडांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता बचावकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस, महसूल प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच NDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले.
संसार काही क्षणांत मातीच्या ढिगाऱ्याखाली
अनेक तासांच्या अथक बचावकार्यानंतर ढिगाऱ्याखालून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. एक वर्षापूर्वीच ज्ञानेश्वर तिकोणे यांचा विवाह झाला होता. कष्टाने उभा केलेला संसार काही क्षणांत मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे.
नंदकुमार तिकोणे हे परिसरातील कष्टाळू आणि मेहनती शेतकरी म्हणून परिचित होते. कुटुंबाच्या सुखासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या या शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबावर काळाने घाला घातल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील अनेक दरडप्रवण भाग धोक्याच्या छायेत आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे आणि कोणतीही धोकादायक परिस्थिती दिसल्यास तातडीने प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रात्रभर कोसळलेल्या पावसाने एका कष्टकरी शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब हिरावून नेल्याने मावळ तालुका शोकमग्न झाला आहे.















