न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ६ जुलै २०२६) :- मुसळधार पावसामुळे चिंचवड येथील महाराणा प्रताप गोशाळेत पुराचे पाणी शिरल्याने अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या गोशाळेत सध्या सुमारे २०० ते २५० गायी असून, पाण्यामुळे त्यांचे मोठे हाल होत आहेत. या दुर्घटनेत एका गायीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने गोशाळेतील गायींना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धनेश्वर परिसरातील नवीन पुलावर गायींना आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, बचावकार्यासाठी मनुष्यबळाची तातडीची आवश्यकता आहे.
सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी तात्काळ धनेश्वर येथील नवीन पुलाजवळ पोहोचून बचाव कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन गोशाळा व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.















