- नगरसेविका अनिता संदीप काटे यांची मागणी…
- मुसळधार पावसाने शेकडो कुटुंबांचे नुकसान..
- त्वरित पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ७ जुलै २०२६) :- मागील तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 मध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून जिल्हा प्रशासन आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने पूरग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नगरसेविका अनिताताई संदीप काटे यांनी केली आहे.
सततच्या पावसामुळे परिसरातील सांडपाणी वाहिन्या तुंबल्याने विश्वशांती कॉलनी क्रमांक 4 आणि 6 परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. विश्वशांती कॉलनीच्या प्रवेशद्वारावर दुर्गंधीयुक्त सांडपाणी साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पवनानगर परिसरातील बैठ्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरून मोठे नुकसान झाले, तर दत्तमंदिर रोड ते स्मशानभूमी मार्ग पाण्याखाली गेला आहे. गावठाण परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
कुंदन इस्टेट सोसायटी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून तलावाचे स्वरूप निर्माण झाले. दरम्यान, पवना नदीला आलेल्या पुरामुळे पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील अनेक बैठ्या घरांमध्ये पाणी घुसले. प्रशासनाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर अनेक कुटुंबांना महापालिकेच्या अण्णासाहेब मगर विद्यालयात स्थलांतरित करण्यात आले. तेथे त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
पूराच्या पाण्यामुळे टीव्ही, फ्रिज, फॅन, कुलर यांसारखी घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे निकामी झाली असून अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे नागरिकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या सर्व नुकसानीचा तातडीने पंचनामा करून पूरग्रस्तांना योग्य ती आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका अनिताताई संदीप काटे यांनी केली आहे. तसेच, भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सांडपाणी व्यवस्था आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या यंत्रणेत कायमस्वरूपी सुधारणा करण्याचीही आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी केवळ पाहणी नव्हे, तर तातडीची नुकसानभरपाई आणि ठोस मदत आवश्यक आहे.– संदीप काटे.

















