- निविदा अटी बदलून एल-1, एल-2 क्रमवारीत फेरफार झाल्याचा विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ७ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) गटाचे गटनेते भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी पीएमपीएमएलच्या 1000 सीएनजी स्वमालकीच्या बस खरेदी प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. संपूर्ण खरेदी प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
भोईर यांनी निवेदनात म्हटले आहे की, मूळ निविदा आयटीएमएस (ITMS) सुविधेसह बस खरेदीसाठी काढण्यात आली होती. त्या प्रक्रियेत टाटा मोटर्स एल-1 आणि अशोक लेलँड एल-2 होते. मात्र, नंतर अचानक आयटीएमएस वगळून बंद लिफाफ्यातून नव्याने दर मागविण्यात आले. यामुळे निविदेतील एल-1 आणि एल-2 क्रमवारीत फेरफार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
बंद लिफाफ्यातून शेकडो कोटी रुपयांच्या कामासाठी दर मागविणे शासन निर्णयाच्या तरतुदींना विरोधात असल्याचा दावा भोईर यांनी केला आहे. तसेच पीएमपीएमएलकडे आवश्यक तांत्रिक विभाग आणि आरटीओ प्रतिनिधी असताना आयटीएमएसची आवश्यकता माहिती नव्हती, हा दावा ग्राह्य धरता येणार नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
निविदेचे स्वरूप बदलताना संचालक मंडळाची पूर्वमान्यता घेण्यात आली का, कामाच्या अटी का बदलण्यात आल्या, तसेच नंतर पुन्हा प्रत्येक बसवर अतिरिक्त खर्च करून आयटीएमएस बसविण्याची वेळ का आली, असे अनेक प्रश्नही भोईर यांनी उपस्थित केले आहेत. शासन नियमांचे उल्लंघन करून संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप करत या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी समिती नेमून सत्य समोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत पीएमपीएमएलची अधिकृत भूमिका अद्याप प्राप्त झालेली नाही.

















