- शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांच्या कर्तव्यतत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ७ जुलै २०२६) :- शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शाहूनगर परिसरात रस्त्यालगतचे एक मोठे झाड अचानक कोसळल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा गंभीर दुखापत झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक आणि सहकाऱ्यांच्या मदतीने झाडाच्या फांद्या बाजूला करून रस्ता मोकळा करण्याचे काम करण्यात आले. तसेच अग्निशमन दलाला त्वरित माहिती देऊन पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी कळविण्यात आले.
यावेळी इरफानभाई सय्यद यांनी नागरिकांना पावसाळ्यात सतर्क राहण्याचे आवाहन केले. अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, कोसळलेल्या झाडांजवळ किंवा धोकादायक ठिकाणी गर्दी करू नये, कोणतीही आपत्कालीन घटना आढळल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले. अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे आणि स्वतःसह इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

















