- तुटलेल्या वीजतारा अथवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळा…
- नगरसेविका अनिताताई काटे यांच आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ७ जुलै २०२६) :- सततच्या मुसळधार पावसामुळे पिंपळे सौदागर व परिसरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने महावितरणच्या काही डीपीमध्ये पाणी शिरले आहे. तसेच अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून वीजवाहक तारांवर पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित भागातील वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.
महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक पथके घटनास्थळी दाखल असून बिघाड दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत होण्याची शक्यता आहे.
तोपर्यंत नागरिकांनी संयम बाळगावा, विद्युत उपकरणांचा वापर काळजीपूर्वक करावा आणि कोणत्याही तुटलेल्या वीजतारा अथवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नगरसेविका अनिता संदीप काटे आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप विठ्ठल काटे यांनी नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

















