- पालखी मार्गांवर ७३ अधिकारी-कर्मचारी, रुग्णवाहिका, प्रथमोपचार किट व कार्डियाक ॲम्ब्युलन्सची व्यवस्था…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ७ जुलै २०२६) :- आषाढी पालखी सोहळा २०२६ निमित्त लाखो वारकऱ्यांना अखंड व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने व्यापक नियोजन केले आहे. पालखी मार्गावर एकूण सात वैद्यकीय पथके कार्यरत राहणार असून त्यासाठी ७३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ज्ञ, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, आशा स्वयंसेविका, रुग्णवाहिका चालक आदींचा पथकात समावेश आहे.
वारकऱ्यांसाठी १,९२५ शौचालये, ६२५ स्नानगृहे आणि १,५०० प्रथमोपचार किटची व्यवस्था करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील प्रमुख ठिकाणी २४ तास वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका तसेच आदित्य बिर्ला हॉस्पिटल आणि केएलई मेडिकव्हर हॉस्पिटलच्या सहकार्याने कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध राहणार आहेत.
महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये २४ तास मोफत आरोग्यसेवा सुरू राहणार असून पालखी काळात किमान १० टक्के खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत. पावसाळी परिस्थिती आणि संभाव्य आपत्कालीन घटनांचा विचार करून झोनल व नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून वारकरी, भाविक व नागरिकांना वेळेत आरोग्यसेवा देण्याचे निर्देश दिले आहेत.

















