- राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थी वारीतून पथनाटयातून करणार व्यसनमुक्ती व सायबर जनजागृती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ९ जुलै २०२६) :- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आज पहाटे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी चिंचवडमधून मार्गस्थ झाली. यावेळी चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्यूटर स्टडीजच्या वतीने वारकऱ्यांसाठी सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला.
प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा व संचालिका डॉ. तेजल शहा यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनाखाली प्रतिभा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सुकलाल कुंभार व प्रा. सुप्रिया गायकवाड यांच्यासह सुमारे ४० विद्यार्थ्यांनी पालखीचे भक्तिभावाने स्वागत केले.
यावेळी पालखीतील दिंडीचे झेंडेकरी, पताकाधारी, टाळकरी, पखवाज वादक, विणेकरी तसेच तुळशी वृंदावन व पाण्याचे हांडे घेतलेल्या महिला वारकऱ्यांना बंद बाटलीतील पाणी, सकस व बंद पाकिटातील लाडू, केळी, सफरचंद यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पादुकांचे दर्शन घेऊन वारीचा मंगलमय प्रारंभ केला.
राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थी वारीतून करणार जनजागृती
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने प्रतिभा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे ६ विद्यार्थी प्रतिनिधी – अभिजीत वाघमारे, सत्यजित जाधव, सरस्वती जोशी, रिया गौतम, सिद्धेश जाधव व सार्थक गायकवाड यांची २१ दिवसांच्या वारी कॅम्पसाठी निवड करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या सूचनेनुसार हे विद्यार्थी पालखीसोबत प्रवास करताना जागोजागी पथनाट्याद्वारे जनजागृती करणार आहेत. व्यसनमुक्ती आणि सायबर क्राईमुळे होणारी फसवणूक कशी टाळावी यावर जनतेला प्रबोधन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
याशिवाय वारीदरम्यान वारकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मदत करणे, मार्गदर्शन करणे यासारखी सामाजिक बांधिलकीची भूमिका देखील प्रतिभा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी पार पाडणार आहेत.
समाजसेवेचा आणि अध्यात्माचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला. वारकऱ्यांनीही विद्यार्थ्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले.
















