न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ८ जुलै २०२६) :- मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पात कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी केली आहे.
बायो-मायनिंगसाठी कोट्यवधी रुपयांची निविदा देऊनही कचऱ्याचा ढीग सपाट का करण्यात आला नाही, तसेच काम संथ गतीने का झाले, याबाबत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. दोन महिन्यांपूर्वीही ढिगारा कोसळल्याचा प्रकार घडूनही दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषी कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अडकलेल्या कामगारांना तातडीने सुखरूप बाहेर काढून मोफत उपचार द्यावेत आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
















