न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ८ जुलै २०२६) :- मोशी कचरा डेपो येथे बुधवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास कचऱ्याचा मोठा ढीग तीन मजली इमारतीवर कोसळल्याने खळबळ उडाली. या दुर्घटनेत अंदाजे १९ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, त्यापैकी ४ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
घटनेनंतर एनडीआरएफ, महापालिकेचे अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. महापौर रवि लांडगे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. बचाव मोहिमेला गती देण्यासाठी लष्कराचीही मदत मागविण्यात आली असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे.
















