न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ९ जुलै २०२६) :- अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाच्या राखीव जागांवर बोगस जात वैधता प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश घेतलेल्या ३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले असून, या प्रकरणी दोन सहाय्यक प्राध्यापकांसह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत ९ आरोपींना अटक करण्यात आली असून दोन जण फरार आहेत. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विधिमंडळात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी ही माहिती दिली.
मंत्री उईके यांनी सांगितले की, राज्यातील सर्व अनुसूचित जमाती पडताळणी समित्यांची कार्यालये अद्ययावत करण्यात आली असून, अंतिम जात वैधता प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला राखीव जागेवर प्रवेश देऊ नये, असे सर्व शैक्षणिक संस्थांना कठोर निर्देश देण्यात आले आहेत. बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे शैक्षणिक व अन्य लाभ घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

















