न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ८ जुलै २०२६) :- आळंदीतील वारकऱ्यांच्या समस्या, दलित व मागासवर्गीय दिंड्यांची गैरसोय तसेच धर्मशाळेच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी जाहीर करण्यात आलेले सत्याग्रह आंदोलन डॉ. बाबा कांबळे यांनी मागे घेतले आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे, आळंदी नगरपरिषदेचे अधिकारी, पोलीस प्रशासन आणि नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर प्रशासनाने पालखी सोहळ्यापूर्वी वारकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले.
डॉ. बाबा कांबळे यांनी पूरपरिस्थिती आणि वारकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन आंदोलनाऐवजी प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. पालखी सोहळा शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडावा, तसेच समाजकंटकांना संधी मिळू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, धर्मशाळेचे पावित्र्य, वारकऱ्यांचा सन्मान आणि दलित दिंड्यांवरील अन्यायाविरोधातील कायदेशीर लढा सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार महेश लांडगे, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे आणि आळंदी प्रशासनाचे त्यांनी आभार मानले.

















