- दोषींवर कठोर कारवाईची मागणी…
- पावसाळी अधिवेशनात ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे सरकारचे लक्ष वेधले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. १० जुलै २०२६) :- राज्यात मागासवर्गीय समाजावरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत भाजप आमदार अमित गोरखे यांनी पावसाळी अधिवेशनात ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे सरकारचे लक्ष वेधले.
जळगाव, बीड, सोलापूर आणि इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथे घडलेल्या अत्याचार, हत्या आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी सरकारकडे तातडीने कारवाईची मागणी केली.
सर्व प्रकरणांतील आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत कठोर कारवाई, पीडित कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत आणि गृहविभागाने सभागृहात निवेदन करावे, अशी मागणी त्यांनी केली. बीड प्रकरणातील पोलिसांच्या कथित निष्काळजीपणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी गोरखे यांनी केली. मागासवर्गीय समाजात निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सभागृहात नमूद केले.

















