न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ९ जुलै २०२६) :- राज्यात मागासवर्गीय समाजावरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी पावसाळी अधिवेशनात ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे सरकारचे लक्ष वेधले. जळगाव, बीड, सोलापूर आणि इंदापूर तालुक्यात घडलेल्या अत्याचार, हत्या व लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, पीडित कुटुंबांना तातडीने न्याय व आर्थिक मदत द्यावी तसेच कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी गृहविभागाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी गोरखे यांनी केली. बीड येथील प्रकरणात पोलिसांच्या कथित निष्काळजीपणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. मागासवर्गीय समाजात निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी नमूद केले.

















