न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ९ जुलै २०२६) :- मोशी कचरा डेपो येथील प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या दुर्घटनेत बचावकार्यादरम्यान आतापर्यंत ९ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, आज सकाळी बाहेर काढण्यात आलेले भावेश मोहन वाणी (वय ३४) यांचा मृत्यू झाला. ते मोशी येथील अँथनी कंपनीकडे अकाउंटंट म्हणून कार्यरत होते.
मूळचे वाणी गल्ली, शिरसोली प्र.न., ता. जि. जळगाव येथील असलेले भावेश वाणी हे सध्या निगडीतील रुपीनगर येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात वडील मोहन रामचंद्र वाणी आणि पत्नी मोहिनी वाणी असा परिवार आहे.
८ जुलै रोजी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेवेळी इमारतीत सुमारे २३ जण अडकले होते. त्यापैकी पाच जण सुरुवातीला सुरक्षित बाहेर पडले, तर बचाव पथकांनी रात्री उशिरापर्यंत आणखी नऊ जणांची सुटका केली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), भारतीय सेना, महापालिका व पीएमआरडीए अग्निशमन दल तसेच पोलीस प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.
अद्यापही सुमारे आठ नागरिकांचा शोध युद्धपातळीवर सुरू असून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

















