न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २४ जुलै २०२६) :- जुनी सांगवीतील आहिल्याबाई होळकर घाट परिसरात एका ५१ वर्षीय नागरिकावर “तू पोलिसांना आमची माहिती देतोस” असा आरोप करत चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि. २३) सायंकाळी घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीच्या मनगटाला फ्रॅक्चर झाले असून डोक्याला व पाठीवरही गंभीर दुखापत झाली आहे.
याप्रकरणी विजय आदिकराव साठे (वय ५१, रा. जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साठे हे आहिल्याबाई होळकर घाटावर बसले असताना तेथे दारू पित बसलेल्या यश बर्डे, अमित चलवादी, राहुल चव्हाण (दोघे रा. मुळानगर, जुनी सांगवी) आणि अक्षय मोरे (रा. जुनी सांगवी) यांनी त्यांच्याशी वाद घातला. “तू पोलिसांचा खबरी आहेस, आमची माहिती का देतोस?” असे म्हणत आरोपींनी त्यांना खाली पाडून मारहाण केली.
यावेळी अक्षय मोरे याने लोखंडी रॉडने वार करण्याचा प्रयत्न केला. साठे यांनी बचाव करण्याचा प्रयत्न करताच त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर गंभीर मार लागून फ्रॅक्चर झाले. तसेच डोक्याच्या मागील भागावर आणि पाठीवरही वार करून जखमी करण्यात आले. इतर आरोपींनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली आणि अंगावरील कपडे फाडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सांगवी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक जगताप पुढील तपास करीत आहेत.


















