न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ जुलै २०२६० :- विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) २०२६ अंतर्गत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांतील सर्व पात्र नागरिकांनी ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, वेळेत अर्ज सादर करणाऱ्या पात्र नागरिकांची नावे १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत बीएलओंकडून घरभेटी देऊन गणना अर्जांचे वितरण आणि संकलन सुरू आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे लोकशाहीसाठी अत्यावश्यक असल्याचे सांगत नागरिकांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन केले. अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनीही बीएलओंना सहकार्य करून अर्ज वेळेत भरावेत, असे आवाहन केले.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नव्या नोंदणीसाठी नमुना क्रमांक ६, दुरुस्तीसाठी नमुना क्रमांक ८ आणि अपात्र नोंदी वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७ भरता येणार आहे. अंतिम मतदार यादी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.


















