न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ जुलै २०२६० :- पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक वाहतुकीची गरज लक्षात घेऊन हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट (एचसीएमटीआर) आणि इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम (ई-आरटीएस) प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी प्रायोगिक प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करून नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या.
या बैठकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ई-आरटीएसची संकल्पना सादर केली. रबर टायरवर धावणाऱ्या पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांवर आधारित ही प्रणाली मेट्रोप्रमाणे वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असेल. प्रत्येक वाहनातून सुमारे २४० प्रवाशांची वाहतूक करता येणार आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात गोडाऊन चौक–कुदळवाडी चौक–ऑटो क्लस्टर–काळेवाडी फाटा–जगताप डेअरी चौक–वाकड असा सुमारे १७ किलोमीटरचा प्रायोगिक मार्ग विकसित करण्यात येणार आहे. महामेट्रोच्या सहकार्याने हा प्रकल्प एक ते दीड वर्षांत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.
प्रायोगिक टप्पा यशस्वी झाल्यानंतर शहरातील एचसीएमटीआर आणि बीआरटी मार्गांवर ई-आरटीएसचा टप्प्याटप्प्याने विस्तार केला जाणार आहे. तसेच मेट्रो, रेल्वे आणि अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांशी प्रभावी जोडणी करून नागरिकांना जलद, सुरक्षित आणि अखंड प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे.


















