न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३१ जुलै २०२६) :- भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालये, विभागप्रमुख आणि संबंधित यंत्रणांना २४ तास सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.
सखल भाग, पूरप्रवण क्षेत्र, नाले, पूल, उड्डाणपूल आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, जलनिस्सारण, विद्युत व स्थापत्य विभागांनी समन्वयाने कार्य करून आवश्यक मनुष्यबळ, पंपिंग मशिन्स आणि बचाव साहित्य उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे तसेच पाणी साचलेल्या किंवा वेगाने वाहणाऱ्या पाण्यात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आपत्कालीन मदतीसाठी महापालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले असून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.

















