न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३१ जुलै २०२६) :- कासारवाडी येथील रेल्वे क्रॉसिंग फाटक क्रमांक ६१ कायमस्वरूपी बंद करण्याच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करून फाटक पूर्ववत सुरू ठेवावे, अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी महाप्रबंधकांना निवेदन दिले आहे.
कासारवाडीच्या पूर्व व पश्चिम भागांना जोडणारा हा एकमेव महत्त्वाचा मार्ग असून फाटक बंद झाल्यास हजारो नागरिक, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा वळसा घालावा लागेल, असे बारणे यांनी नमूद केले. तसेच धार्मिक मिरवणुका, सामाजिक कार्यक्रम, अंत्ययात्रा, रुग्णवाहिका, अग्निशमन दल व पोलिसांच्या हालचालींवरही परिणाम होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
फाटक बंद करणे अपरिहार्य असल्यास प्रथम रेल्वे उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग उभारून तो नागरिकांसाठी खुला करावा आणि त्यानंतरच फाटक बंद करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही खासदार बारणे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.


















