- दागिने घेऊन आरोपी फरार; दिघी पोलिसांत गुन्हा दाखल…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०१ जुलै २०२६) :- दागिने तयार करून घेतल्यानंतर उर्वरित रक्कम ऑनलाइन पाठवल्याचा बनावट (NEFT) स्क्रीनशॉट दाखवून सराफाची ६ लाख २९ हजार ७८० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १८ मार्च २०२६ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कृष्णा सिल्वर वर्क शॉप, दुकान क्रमांक २, सावंतपुघी, ता. हवेली येथे घडली. या प्रकरणी निलेश बाळकृष्ण जाधव (वय ४६, रा. आदर्श नगर, दिघी) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, विवेक आनंद हातकामकर (वय ३६, रा. पोलादपूर, जि. रायगड) याने विश्वास संपादन करून दागिने तयार करण्यासाठी ३ लाख रुपये आगाऊ दिले. त्यानंतर फिर्यादींकडून ५९.८७० ग्रॅम वजनाचे, एकूण ९ लाख २९ हजार ७८० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तयार करून घेतले. उर्वरित ६ लाख २९ हजार ७८० रुपये एनईएफटीद्वारे पाठवल्याचा बनावट स्क्रीनशॉट दाखवून आरोपीने दागिने ताब्यात घेतले आणि तेथून निघून गेला.
नंतर खात्यात रक्कम जमा न झाल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या निदर्शनास आले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) अन्वये दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.


















