- इशारा न दिल्याचा आरोप; अज्ञात चालकाविरुद्ध हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०१ जुलै २०२६) :- मुंबई–सातारा महामार्गावरील वाकड पुलाजवळ बंद पडलेल्या हायवा ट्रकला मागून ट्रकची धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, तर एका महिलेस किरकोळ दुखापत झाली. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अज्ञात हायवा चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी संजय रामचंद्र कवडे (वय ४२, रा. भिवंडी, जि. ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १ ऑगस्ट रोजी पहाटे साडेएकच्या सुमारास मुंबई–सातारा महामार्गावरील वाकड पुलाजवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पत्नी कल्पना आणि सासरे निवृत्ती जावजी पवार यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील मूळ गावी कार्यक्रमासाठी अशोक लेलँड ट्रक (एमएच ०४ जीआर २२७३) मधून प्रवास करत होते. त्यावेळी महामार्गावर टाटा हायवा ट्रक (एमएच २० ईएल ९६००) बंद अवस्थेत उभा होता. संबंधित चालकाने ट्रकच्या मागे रिफ्लेक्टिव्ह वॉर्निंग ट्रँगल लावला नव्हता, पार्किंग लाईट किंवा अन्य कोणताही इशारा दिला नव्हता. त्यामुळे मागून येणाऱ्या ट्रकची त्या हायवाला जोरदार धडक बसली.
या अपघातात फिर्यादींचे सासरे निवृत्ती जावजी पवार आणि ट्रक चालक पंढरीनाथ बांदेकर (रा. सांगली) यांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला. फिर्यादींची पत्नी कल्पना या किरकोळ जखमी झाल्या असून ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी अज्ञात हायवा चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५(अ)(ब), २८१, ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ताकतोडे करीत आहेत.

















