- सातव्या वेतन आयोगानुसार आदेश जारी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०१ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार पात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती (एमएसीपी) योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एकूण ७७२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकालानुसार वेतनवाढीचा लाभ मिळणार असून त्यासंदर्भातील प्रशासकीय आदेशही जारी करण्यात आले आहेत.
महापालिकेने सेवाविषयक नियम, समितीच्या शिफारशी आणि लागू असलेल्या प्रशासकीय निकषांचा विचार करून ही प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये १०, २० आणि ३० वर्षे नियमित सेवा पूर्ण केलेल्या पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. लाभ मंजूर करण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांची सेवा नोंद, पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता, विभागीय परीक्षा, गोपनीय अहवाल, प्रलंबित चौकशी, न्यायालयीन प्रकरणे तसेच अन्य सेवा अटींची सखोल पडताळणी केली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या विद्यमान वेतनश्रेणीतील पुढील वेतनस्तराचा लाभ दिला जाणार आहे. तसेच, २०२० मध्ये लागू झालेल्या नवीन सेवा प्रवेश व सेवावर्गीकरण नियमांपूर्वी आणि त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत.
महापालिकेच्या माहितीनुसार, १० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या २१६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यातील लाभ, २० वर्षे पूर्ण केलेल्या ३१९ जणांना दुसऱ्या टप्प्यातील लाभ, तर ३० वर्षे सेवा बजावलेल्या २३७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना तिसऱ्या टप्प्यातील लाभ मंजूर करण्यात आला आहे. संबंधित विभागांकडून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जात आहे.
याबाबत अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी सांगितले की, सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी नियमानुसार सुरू असून, पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने लाभ देण्यात येत आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेचा योग्य सन्मान होण्याबरोबरच त्यांच्या कामकाजातील उत्साह आणि मनोबलातही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

















