- विशेष सभेत एकमताने ठराव मंजूर…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०१ जुलै २०२६) :- देहूगाव नगरपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला महत्त्वपूर्ण गती मिळाली असून, यासंदर्भातील ठराव शुक्रवारी (३१ जुलै) आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांच्या एकमताने मंजूर करण्यात आला. नगराध्यक्षा पूजा दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.
सभेला मुख्याधिकारी चेतन कोंडे, उपनगराध्यक्षा प्रियांका मोरे, माजी नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, नगरसेविका पूनम काळोखे, सपना मोरे तसेच नगरसेवक प्रवीण काळोखे, योगेश परंडवाल, योगेश काळोखे, मयूर टिळेकर आणि मयूर शिवशरण उपस्थित होते. याशिवाय कार्यालयीन अधीक्षक प्रिया कदम, लेखापाल केशव पिनाटे, धनंजय नाईकवडे, नगर अभियंता संघपाल गायकवाड यांच्यासह अन्य अधिकारीही बैठकीस उपस्थित होते.
बैठकीत देहूगावच्या वाढत्या लोकसंख्येचा आढावा घेण्यात आला. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे १८ हजार असलेली लोकसंख्या आगामी २०२७ च्या जनगणनेपर्यंत २५ हजारांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. लोकसंख्येतील वाढ आणि शहराच्या विस्ताराचा विचार करता देहूगावला नगर परिषदेचा दर्जा मिळण्यासाठी आवश्यक निकष पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
यानंतर देहूगाव नगरपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करण्याचा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवण्यात आला. या प्रस्तावाला सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. आता हा ठराव पुढील प्रशासकीय आणि शासकीय मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी दिली.

















