- इंद्रायणीनगर क्रीडा संकुल परिसरातील घटना; मारहाणीत गंभीर दुखापत…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ०१ जुलै २०२६) :- भोसरीतील इंद्रायणीनगर क्रीडा संकुल मैदान परिसरात पैशांच्या वादातून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी दिपाली संदीप डोळस (वय ३३, रा. राधानगरी हौसिंग सोसायटी, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, १ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास इंद्रायणीनगर क्रीडा संकुल मैदान येथे त्यांच्या पती संदीप यांच्याशी पैशांच्या कारणावरून वाद झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अनिल सुभाष लांडे याने “यास जिवंत सोडायचे नाही,” अशी धमकी देत बापू साहेबराव अहिवळे आणि राजन जयचंद जिनवाल यांच्या मदतीने संदीप यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात संदीप यांच्या पोटात अंतर्गत रक्तस्राव झाला असून, कंबरेखालीही गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी अनिल सुभाष लांडे, बापू साहेबराव अहिवळे आणि राजन जयचंद जिनवाल यांच्याविरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी राजन जिनवाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तळेकर करीत आहेत.


















