- कॉपीराइट कायद्यांतर्गत कारवाई; दुकानातून बनावट मीठाचा साठा जप्त…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. ०१ जुलै २०२६) :- मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील एका दुकानात बनावट ‘टाटा सॉल्ट’ची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, भोसरी एमआयडीसी पोलिसांनी संबंधित दुकानदाराविरोधात कॉपीराइट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील तुळशी ट्रेडिंग (शॉप क्र. १८) येथे कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कृष्णा देवीप्रसाद कनोजीया (वय ५०, रा. मालाड, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात गोपाल प्रभुरामजी प्रजापत (वय २८, रा. मोरया कॉलनी, मोशी) याच्याविरुद्ध कॉपीराइट कायदा कलम ५१ व ६३ अन्वये भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
तपासात आरोपीने टाटा सॉल्ट कंपनीच्या नावाने बनावट मीठ विक्रीसाठी दुकानात साठवून ठेवल्याचे आढळून आले. हे उत्पादन ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण करू शकते, याची माहिती असतानाही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या कृत्यामुळे संबंधित कंपनीच्या स्वामित्व हक्कांचे उल्लंघन झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


















