- बस मार्गांची माहिती नाही, बसण्यासाठीची बाकडी तुटलेली…
- तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०१ जुलै २०२६) :- चिंचवडगावातील मोरया हॉस्पिटलसमोरील बस स्थानकाची दुरवस्था झाल्याने दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
हे बस स्थानक परिसरातील महत्त्वाचे केंद्र असून येथून अनेक पीएमपीएमएल बसमार्गांवर प्रवासी प्रवास करतात. मात्र बस स्थानकावर कोणती बस, कोणत्या क्रमांकाची आणि कोणत्या मार्गावर जाणार आहे, याची माहिती दर्शविणारे फलक उपलब्ध नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडत आहे.
याशिवाय बस थांब्यावर बसण्यासाठीची बाकडीही तुटलेल्या अवस्थेत असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. पावसाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित प्रशासनाने बस स्थानकाची तातडीने दुरुस्ती करून माहिती फलक, बसण्याची व्यवस्था आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
















